प्रतिनिधी / कुरुंदवाड
महाडमधील काजळापूर येथील पाच मजली तारीक पॅलेस इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण अडकले असण्याची भीती व्यक्त होत होती. त्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने घटनास्थळी एनडीआरएफ व व्हाईट आर्मीच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. तर या बचावकार्यासाठी कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील सात जणांच्या पथकानेदेखील घटनास्थळी जाऊन मदत कार्यामध्ये सहभाग घेतला.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजळापूर येथे सोमवारी दिनांक २४ रोजी सायंकाळी तारीक पॅलेस नावाची पाच मजली इमारत कोसळून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. यात सात पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. तर इमारतीच्या ढिगार्यातून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात रेस्कु फोर्स, एनडीआरएफची टीम, व्हाईट आर्मी व शिरोळच्या हेल्पिंग अँड रेस्कु फोर्सच्या जवानांना यश आले. दुर्घटनास्थळी मदत व बचाव कार्य सुमारे चाळीस तास अहोरात्र सुरू होते.
पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडल्यावर कोणताही विलंब न लावता शिरोळ तालुक्यातील हेल्पिंग अँड रेस्कु फोर्सचे जवान प्रदीप ऐनापुरे, नितेश वनकोरे, नितीन लोहार, निलेश वनकोरे, केदार शिकलगार, अक्षय निर्मळे, शलमोन आवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात सुरूवात केली. त्यांच्या या साहसी कार्याचे तालुक्यात कौतुक होत आहे.