प्रतिनिधी / सांगरूळ
सांगरुळ (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील सहाही व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे दक्षता समितीसह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. येथील एका ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत आहे. तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील सहा व्यक्तींना क्वॉरंन्टाईन करून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. या सहाही व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रशासनाने जनता कर्फ्यू लागू केल्यापासून कोरोनापासून बचावासाठी या गावाने सर्वपक्षीय एकत्र येऊन दक्षता समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध उपाययोजनांचा प्रभावीपणे अमल करून जिल्ह्यात कोरोना विरुद्धच्या लढ्यात ‘सांगरूळ पॅटर्न’ निर्माण केला होता. येथील युवकानी दक्षता समितीच्या माध्यमातून रात्रंदिवस कडक बंदोबस्त करून गावात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ दिला नव्हता. पण चार दिवसापूर्वी कोल्हापूरच्या एका खाजगी दवाखान्यात रुग्णसेवा करणाऱ्या गावातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील सहा व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी दिल्याने दक्षता समितीसह ग्रामस्थांचे लक्ष या व्यक्तींच्या अहवालाकडे लागले होते. या सहाही व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.