पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाची कारवाई
प्रतिनिधी/ कोल्हापूर
शहरात माळरानावर, मैदानावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र शनिवारी रात्री, कायद्याच्या रक्षकांकडून नियम पायदळी तुडवण्यात आले. कसबा बावडा येथील शंभर फुटी रोड वर मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. यातील दोघे महामार्ग पोलिस कर्मचारी आहेत. उपधीक्षक मंगेश चव्हाण यांनी शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
महामार्ग पोलीस कर्मचारी बळवंत शामराव पाटील, राजकुमार शंकर साळुंखे यांच्यासह जितेंद्र अशोक देसाई यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरांमध्ये काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण हे कसबा बावडा येथून निघाले होते. त्यांना शंभर फुटी रस्ता येथे तिघेजण दारू पिताना दिसले. चव्हाण यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिघांना हटकले प्राथमिक चौकशी केल्यानंतर बळवंत पाटील व राजकुमार साळुंखे हे महामार्ग पोलीस कर्मचारी असल्याचे समजले. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले रविवारी त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली.
धक्काबुक्कीची चर्चा
या तिघांनी उपधीक्षक मंगेश चव्हाण यांना धक्काबुक्की केल्याची चर्चा होती. याबाबत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, दारू पिणाऱ्या तिघांची प्राथमिक चौकशी करून त्यांना आम्ही जीप मध्ये बसवले. त्यावेळी त्यांनी विरोध केला. मात्र यावेळी कोणालाही धक्काबुक्की झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.