सांगरूळ / वार्ताहर
फटाक्यांची आतषबाजी व कर्णकर्कश वाद्यांना बगल देत सोशल डिस्टन्स ठेवत शासकीय आदेशाचे पालन करत सांगरूळ व सांगरूळ परिसरात घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले.
सांगरूळसह परिसरातील गावांमधून दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मोठ्या प्रमाणात देखाव्यांचे आयोजन केले जाते. पण चालू वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक गावातून एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला आहे. तर काही गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजीव देखाव्यांचे कार्यक्रम व सवादय मिरवणुका रद्द करून फक्त श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सोशल डिस्टन्स ठेवत श्री गणरायाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. सांगरूळसह परिसरातील म्हारूळ बहिरेश्वर खाटांगळे पासार्डे आमशी बोलोली उपवडे सह बारा वाड्यातील घरगुती व सार्वजनिक गणेशाचे आगमन उत्साहात झाले.