प्रतिनिधी/ कराड
शहरात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, अंगणवाडी, आशा वर्कर्स जीव धोक्यात घालून कोरोना विरोधात लढा देत आहेत. दुर्देवाने या कोविड योद्धय़ांपैकी कोणाला कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्यासाठी शहरात राखीव बेड असावेत. कराडकर नागरिक बाधित झाला तर त्याच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी राखीव हॉस्पिटल असावे, अशी सूचना पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरस्तरीय व प्रभाग समितीच्या बैठकीत जनरल रूग्ण तपासणी करणारे डॉक्टर, डेंटिस्ट, सामाजिक संस्था यांचा सहभाग होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव चव्हाण, गटनेते राजेंद्रसिंह यादव, सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती महेश कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, मोहसीन आंबेकरी, विद्या पावसकर, बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराडमध्ये कोरोना बाधित उपचारासाठी रूग्ण वाढत आहेत. त्यात जिल्हय़ातील रूग्णांचा समावेश आहे. वाढती संख्या पाहता शहरवासियांसाठी तसेच कोविड योद्धय़ांसाठी राखीव बेड असावेत. तसेच बाधितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे हुलवान यांनी सांगितले.
मास्कचा वापर करणे गरजेचा
बी. आर. पाटील म्हणाले, शासन नियमानुसार कार्यक्रम होणे गरजेचे असल्याने प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी संयोजकांना 50 च्यावर उपस्थिती नसावी याबाबतचे नियम सांगावेत. गर्दी वाढत असून मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
डॉ. चिन्मय एरम यांनी एरम हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांचा वॉर्ड तसेच जनरल वॉर्डमधील ये जा वेगवेगळी केली असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण हॉस्पिटल नॉन कोव्हिड करण्यासाठी लागणारा खर्च हॉस्पिटला परवडणे शक्य नसल्याचे सांगून याबाबत शासनाने तरतूद करावी, असे सूचविले.
डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्यावे
राजेंद्रसिंह यादव यांनी हेल्पलाईनद्वारे नागरिकांना मदत करता येईल असे सूचविले. तर सौरभ पाटील यांनी, मुलांमध्ये बदल होत असून याबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेण्यात यावे, असे सुचवले. नगराध्यक्षा शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.