हजारो रुग्ण झाले कोरोनामुक्त : सेवा कौतुकास्पद, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रुग्णांच्या संख्येतही घट
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यासह जिल्हय़ात एप्रिल-मे दरम्यान कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातल्याने रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली. दरम्यान, शहरातील अनेक हॉस्पिटलमधून बेड व ऑक्सिजनची कमतरता भासली. अनेकांचे हाल झाले तर काहींना मृत्यूलाही सामोरे जावे लागले. दरम्यानच्या काळात शहरात विविध संघटनांनी उभी केलेली कोविड सेंटर अनेक गोर-गरिबांना आधार ठरली आहेत. ‘तरुण भारत’च्या माध्यमातून गुरुवारी शहरातील कोविड केअर्स सेंटर्सना भेट दिली असता आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे पहायला मिळाले.
कोरोनाच्या संकट काळात शहरात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर्समधून अनेक जण वेळेत उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना काळात शहरातील कोविड केंद्रांचे काम महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद ठरले आहे. शहरात महाराष्ट्र एकीकरण समिती, अंजुमन-ए-इस्लाम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनकल्याण ट्रस्ट, महानगरपालिकेची कुमारस्वामी लेआऊट (बॉक्साईट रोड), यासह रामतीर्थनगर, संगमेश्वरनगर, सुभाषनगर, वैभवनगर आदी ठिकाणी असलेल्या कोविड सेंटर्समधून मोफत व काही ठिकाणी सवलतीच्या दरात रुग्णांवर उपचार झाले आहेत.
शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर्स सुरू झाल्याने सरकारी आणि खासगी हॉस्पिटलवरील बराचसा ताण कमी झाला आहे. शिवाय ऑक्सिजन व बेडची कमतरता असताना या सर्व कोविड सेंटरमधून गरजूंना आरोग्याबरोबर इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे कोरोना काळात शहरातील ही कोविड सेंटर्स अनेकांसाठी देवदूत ठरली
आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण ट्रस्ट
अनगोळ क्रॉसजवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण ट्रस्टतर्फे 4 मे पासून कोविड सेंटर चालविले जात आहे. या सेंटरमधून आतापर्यंत 137 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
या ठिकाणी 25 बेडची व्यवस्था करण्यात आली असून मागील वषीदेखील या सेंटरमधून 140 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांची संख्या कमी झाली असून गेल्या दोन दिवसात केवळ दोन रुग्ण दाखल झाले आहेत. सवलतीच्या दरात सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सेंटरमध्ये कमीत कमी खर्चात रुग्णांवर उपचार केले जातात.
शिवाय येथील रुग्णांना सकाळचा नाष्टा, जेवण यासह इतर सुविधा पुरविल्या जातात. खासकरून या ठिकाणी रुग्णांना स्वतंत्र रूम दिल्या जातात. रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे.