नव्या रुग्णांना जागा मिळणे बनले कठीण
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात शनिवारी रात्री 11.30 वा. चोडण येथील एका 50 वर्षीय पुरूषाचा बळी गेला तर काल रविवारी सकाळी न्यू वाडे-वास्को येथील एका 84 वर्षीय महिलेचा बळी गेला. तसेच ताळगांव येथील एका 77 वर्षीय बळी गेला. त्यामुळे गोव्यातील कोरोना बळीची संख्या 75 वर पोचली आहे. सद्या कोविड हॉस्पिटल रूग्णांनी भरले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने नव्याने येणाऱया रूग्णांना जागा मिळणे कठीण होऊन बसले आहे.
शनिवारी रात्री बळी गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब व मूत्रपिंडाचा आजार होता तर काल रविवारी बळी गेलेल्या व्यक्तीला मधुमहे, हृदयविकार तसेच न्यूमोनिया या इतर आजारांची पार्श्वभूमी होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
कोविड हॉस्पिटलात जवळपास 18 गरोदर महिला असून जवळपास 10 महिला या ठिकाणी नवजात बालकासह उपचार घेत आहेत. त्यामुळे कोविड हॉस्पिटलात एका स्त्राr रोग विभागाची गरज भासू लागली आहे. पण, सद्या तरी तशी व्यवस्था करणे शक्य नाही. मडगावचे जिल्हा इस्पितळ पूर्ण क्षमतेने कार्यरत करावे व हॉसिसियो इस्पितळांतील रूग्णांना तिथे स्थलांतरीत करावे व कोरोना बाधित गरोदर महिला तसेच प्रसूत झालेल्या महिलांसाठी वापरात आणावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.