इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
इंग्लंडविरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे विराट कोहली, इशांत शर्मा यांचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय हार्दिक पंडय़ा व डावखुरा स्पिनर अक्षर पटेल यांनाही 18 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱयात पदार्पण केलेल्या टी.नटराजनला या संघातून वगळण्यात आले आहे.
चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नव्या निवड समितीने मंगळवारी संघनिवड केली. याशिवाय कर्णधार विराट कोहलीही या बैठकीला व्हर्च्युअली उपस्थित होता. ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक विजयानंतर काही तासांनी झालेल्या या बैठकीस सुनील जोशी, अबे कुरुविला, देबाशिष मोहंती, हरविंदर सिंगही ऑनलाईन उपस्थित होते. हरविंदर सिंग सध्या ब्रिस्बेनमध्ये आहेत. निवड सदस्यांनी चार राखीव खेळाडूंचीही निवड केली असून ऐनवेळी गरज लागल्यास त्यांना मुख्य संघात स्थान दिले जाऊ शकते. हे खेळाडू संघासमवेत राहणार नाहीत. त्याऐवजी ते स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणार आहेत. पण गरज पडल्यास त्यांना या स्पर्धेतून माघार घ्यावयास लावून राष्ट्रीय संघात पाठविले जाऊ शकते. सदर राखीव खेळाडू भारत अ संघातून खेळले असून त्यात झारखंडचा डावखुरा स्पिनर शाहबाज नदीम, आंध्रचा यष्टिरक्षक केएस भरत, बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन, राजस्थानचा लेगस्पिनर राहुल चहर यांचा समावेश आहे.
सध्या कोरोना महामारीचा काळ सुरू असल्याने नेहमीपेक्षा जास्त खेळाडूची निवडण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यानुसार या संघासोबत पाच नेटबॉलर्सचीही निवड करण्यात आली आहे. अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वॉरियर हे त्यापैकी तीन वेगवान गोलंदाज आहेत. याशिवाय कर्नाटकचा स्पिनर के.गौतम, उत्तरप्रदेशचा डावखुरा स्पिनर सौरभ कुमार यांचाही त्यात समावेश आहे.
निवडण्यात आलेला भारतीय संघ ः रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पंडय़ा, केएल राहुल (पहिल्या कसोटीनंतर फिटनेस चाचणी पास केल्यानंतर), जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, आर. अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू : केएस भरत (यष्टिरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, शाहबाज नदीम, राहुल चहर. नेटबॉलर्स ः अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वॉरियर, के.गौतम, सौरभ कुमार.