प्रतिनिधी/ कराड
येथील मार्केट यार्डामधील प्रभाग बारामधील मार्केट यार्ड गेट क्रमांक एकपासून मलकापूरला जाणारा रस्ता कराड हद्दीत अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने महिन्यापूर्वी अज्ञात नागरिकांनी या रस्त्यावर फ्लेक्स लावले होते. त्यावेळी या रस्त्याचे काम पंधरा दिवसांत सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र महिना उलटला तरी काम सुरू न झाल्याने शनिवारी रात्री पुन्हा या रस्त्यावर अज्ञातांनी फ्लेक्स लावले. यात क्या हुवा तेरा वादा, वो डांबर, वो रस्ता, असा चिमट नगरपालिका आणि स्थानिक नगरसेवकांना काढण्यात आला आहे.
मार्केट यार्ड गेट एकपासून शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमार्गे मलकापूरला जाणारा रस्ता मलकापूरच्या हद्दीत सिमेंटचा करण्यात आला आहे. तर कराडच्या हद्दीत डांबरी असून या रस्त्यावर खड्डे आहेत. स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली होती. मात्र निधीचे कारण पालिकेने पुढे केले होते. त्यामुळे येथील नाराजी वाढत गेली. यातूनच 5 सप्टेंबरला या रस्त्यावर अज्ञातांनी विविध फ्लेक्स लावून रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी या रस्त्याचे काम पंधरा दिवसांत सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र तीही मुदत उलटून गेली. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा काल रात्री फ्लेक्स लावून संबंधितांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
क्या हुआ तेरा वादा, वो डांबर, वो रस्ता, याद है मुझको, तुने कहा था, रस्ता करेंगे 15 दिन में, ये पब्लिक है, सब जानती है अशा आशयाचे फलक या रस्त्यावर पुन्हा लावण्यात आल्याने आज सकाळी पुन्हा खळबळ उडाली. सकाळी हे फलक तातडीने हटवण्यात आले आहेत. मात्र या फलकांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत होते, त्याची शहरात चर्चा होती.
फ्लेक्स वॉर की इलेक्शन वॉर…
दरम्यान, 15 ऑक्टोबरपूर्वी रस्ता डांबरीकरणाची कामे हाती घेता येत नाहीत, तसे शासन आदेश आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम 15 ऑक्टोबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र प्रभाग बारामध्ये या रस्त्यावरून स्थानिक राजकारण उफाळले असल्याचे दिसत आहे. वारंवार येथे रस्त्याच्या कामावरून फ्लेक्स वॉर होत असले तरी ते इलेक्शन वॉर असल्याचेही सांगण्यात येत आहे.