अमेरिकेने केले कौतुक ः दक्षिण आशियाचे नेतृत्व करतोय भारत
@ वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
व्हाईट हाऊसने भारताला क्वाडची शक्ती आणि विकासाचे इंजिन ठरविले आहे. तसेच अमेरिकेने भारताला हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्वतःचे प्रमुख सहकारी संबोधिले आहे. मेलबर्नमध्ये 11 फेब्रुवारीला झालेल्या क्वाडच्या बैठकीनंतर अमेरिकेने ही भूमिका मांडली आहे. या परिषदेत अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन आणि भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर सामील झाले होते.
भारत दक्षिण आशिया आणि हिंदी महासागरात नेतृत्वाच्या भूमिकेत आहे. भारत दक्षिणपूर्व आशियात सक्रिय आहे. क्वाडला पुढे नेणारी शक्ती आणि क्षेत्रीय विकासासाठी भारत एक इंजिन असल्याचे उद्गार व्हाईट हाऊसच्या मुख्य माध्यम सचिव कारीन जीन-पियरे यांनी काढले आहेत.
मेलबर्न परिषदेत चारही देशांच्या विदेश मंत्र्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनची अरेरावी आणि युक्रेन-रशियामधील वादावर चर्चा करण्यात आली. रशियामुळे केवळ युक्रेन नव्हे तर जगात सुरक्षा आणि समृद्धीचा अनेक वर्षांपासून आधार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित व्यवस्थेलाही धोका असल्याची भूमिका अमेरिकेचे विदेशमंत्री ब्लिंकन यांनी मांडली आहे. ब्लिंकेन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाकडून मिळत असलेली आव्हाने आणि युरोपीय सहकाऱयांचे समर्थन करण्याच्या धोरणांवरही चर्चा केल्याची माहिती कारीन यांनी दिली आहे.
भारतासोबत धोरणात्मक भागीदारी
अमेरिकेसोबत भारताची व्यूहात्मक भागीदारी सुरूच राहणार आहे. याचा उद्देश दक्षिण आशियात स्थैर्याला बळ देणे, आरोग्य, अंतराळ, सायबर स्पेस यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करणे, आर्थिक सहकार्याला बळकटी देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
क्वाड म्हणजे काय ?
क्वाडचा अर्थ ‘क्वाड्रीलेटरल सिक्युरिटी डायलॉग’ आहे भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका याचे सदस्य आहेत. क्वाडचा उद्देश हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता राखणे आहे. 2007 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांच्या पुढाकारानुसार हा गट स्थापन करण्यात आला होता. 2019 मध्ये पहिली क्वाड बैठक झाली होती.