प्रतिनिधी /धारबांदोडा :
वारंवार होणाऱया खंड वीज पुरवठय़ामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱया व अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसात होत आहे. मोले पंचायत क्षेत्रामध्ये काम करणारे वीज कर्मचारी बेफिकीर व बेजबाबदारपणे काम करीत आहेत. त्य़ांच्या कामाची पद्धत अत्यंत चुकीची असून मोले पंचायत क्षेत्रात खंडीत होणाऱया वीज पुरवठय़ाला येथील कर्मचारी जबाबदार आहेत असे मोले ग्रामस्थांनी बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या निर्दशनास आणून दिले.
मोले पंचायत क्षेत्रात गेले दोन दिवस वीज पुरवठा खंडीत आहे. शिवाय सतत वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार सुरु आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आमदार दीपक पाऊसकर यांनी मोले पंचायत सभागृहात मोले पंचायत मंडळ व ग्रामस्थांची बैठक बोलावली होती. यावेळ वीज खात्याच्या कारभाराबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. नव्यानेच कुडचडे विभागाचा ताबा घेतलेले साहाय्यक अभियंते इमलेश गांवकर, सरपंच तन्वी केरकर, उपसरपंच सुशांत भगत, पंच सदस्य राजेश सांगोडकर, रामकृष्ण गांवकर, स्नेहलता नाईक, समर कदम व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी कैफियत मांडताना पंच सदस्य रामकृष्ण गांवकर म्हणाले, मोले भागात सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. दिवसातून दहा पंधरा वेळा वीज गायक होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. वीजकर्मचारी बेफिकीरपणे वागत असून या समस्येबद्दल ग्रामस्थ पंचायतीला व पंचसदस्यांना जाब विचारीत आहेत. वीज कर्मचारी जनतेला सेवा देण्यास अपुरे पडत असून त्यामागील कारण मात्र कर्मचारी कमी असल्याचे सांगितले जाते.
या भागात कमी कर्मचारी असून सुद्धा पूर्वी वीज पुरवठा सुरळीत असायचा. शिगांव येथे वीज उपकेंद्रात संपर्क साधल्यास फोन उचलला जात नाही. त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची असे माजी सरपंच वामन खांडेपारकर म्हणाले.
वीज कर्मचाऱयांची काम करण्याची पद्धत अत्यंत चुकीची असून यापूर्वी बांधकाम मंत्र्यांनी अशी बैठक घेतली होती. त्यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचा पाठपुरावा झालेला नाही. काही कर्मचारी मंत्री आपल्या मतदार संघाचा आमदार असल्याचा फायदा घेतात. मंत्र्यांनी अशा बेजबाबदार कर्मचाऱयांना सवलत देऊ नये अशी मागणी शरदचंद्र खांडेपारकर यांनी केली. या मागणीला सर्वांनी सहमती दर्शवली.
समर कदम यांनी मोले बाजारात टय़ूब लाईटस पेटत नसल्याची तक्रार करून त्याकडे लक्ष घालण्याची मागणी केली. यापुढे वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा पंच सदस्य राजेश सांगोडकर यांनी दिला. ग्रामस्थांची सहनशिलता संपली असून ग्रामस्थ आक्रमक होण्याचे संकेत त्यांनी दिले. शहरामध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यास मोबाईल ट्रान्सर्फार्मरची व्यवस्था केली जाते. तीच व्यवस्था या भागात केली जावी, अशी मागणी प्रसाद पांगम यांनी केली.
गेल्या काही वर्षांपासून मोले पंचायत क्षेत्रात विजेची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे म्हणून नव्याने ताबा घेतलेले साहाय्यक अभियंते इमलेश गांवकर यांची या भागात नियुक्ती केली आहे. ते निश्चितच सुधारणा घडवून आणतील. शिवाय मोले भागात भुमीगत वीज वाहिन्या घालण्याचा प्रस्ताव संमत झालेला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर वीज पुरवठय़ात सुधारणा होणार असे बांधकाममंत्री दीपक पाऊसकर म्हणाले. इमलेश गांवकर यांना त्यांनी वारंवार खंडित होणाऱया वीज पुरवठय़ाकडे लक्ष घालण्याची सूचना केली. पंच सदस्य स्नेहलता नाईक, ग्रामस्थ संतोष वेरेकर व इतर नागरिकांनी समस्या मांडल्या.
साहाय्यक अभियंते इमलेश गांवकर यांनी आपण या समस्येवर तोडगा काढणार असल्याची हमी ग्रामस्थांना दिली. शिवाय कनिष्ठ अभियंत्यांना मार्गदर्शन करून नागरिक व कर्मचारी यांच्यामध्ये योग्य प्रकारचा संवाद राहावा यासाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
दरम्यान कुळे शिगांव पंचायत क्षेत्रामध्येही विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसात होत आहे व पाणी पुरवठय़ावरही परिणाम होत आहे.
खंडित विजेमुळे धारबांदोडय़ातील विविध भ्रमणध्वनी मनोऱयांच्या नेटवर्कवर परिणाम होत असून या मोबाईल कंपन्यांनी जनरेटर बसविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.