अपघातात चालकासह दोघे जखमी, खाद्यतेलाचे बॉक्स रस्त्यावर
प्रतिनिधी /खंडाळा
खंबाटकी बोगद्याच्या बाहेर खाद्यतेलाचा ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले. तर हजारो रुपयांच्या मालाचे नुकसान झाल्याचे समजते.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शरीफ शाफ नदाफ रा. हुबळी (कर्नाटक) हे मालट्रकमध्ये सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे खाद्यतेल घेवून निघाले होते. महामार्गावरून जात असताना खंबाटकी बोगद्याच्या बाहेर पहिल्या वळणावर गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पलटी झाला. त्यामध्ये चालक शरीफ शाफ नदाफ व शिवराज बसैय्या तरडीमठ दोघे रा. हुबळी (कर्नाटक) हे किरकोळ जखमी झाले, तर खाद्यतेलाचे बॉक्स अन् पिशव्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोलीस हवालदार अशोक जाधव, बापू कांबळे, सचिन वीर, पूनम बांगर, गणेश सणस, बालाजी वडगावे, श्री. मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्ता निसरडा झाल्याने एशियन पेंटसचा अग्निग्नशामक बंब पाचारण करण्यात आला होता. रस्ता स्वच्छ करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.