बेळगाव / प्रतिनिधी
झणझणीत मिसळ खाण्याचा मोह कोणाला होणार नाही. हवेतील गारवा आणि तर्रीवाली मिसळ असे समीकरण जुळून आलंय ते बेळगावमधील मिसळ महोत्सवामुळे. या महोत्सवाच्या दुसऱया दिवशी म्हणजेच शनिवारी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. खमंग मिसळवर ताव मारणारे खवय्ये या ठिकाणी पहायला मिळत होते. रामनाथ मंगल कार्यालय येथे हा महोत्सव सुरू असून रविवारी याची सांगता होणार आहे.
मिसळचा सुगंध, त्यावर असणारी तर्री व फरसाण दिसले की तोंडाला पाणी सुटणारच. अशी मिसळ कोल्हापूर, पुण्यात मिळत असल्याचे ऐकले होते. परंतु हीच मिसळ सध्या बेळगावमध्येही उपलब्ध झाली आहे. बेळगावबरोबरच कोल्हापूर, पुणे, नाशिक येथील मिसळपाव या महोत्सवात उपलब्ध आहे. वेगवेगळय़ा तऱहेच्या मिसळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. मिसळची चव चाखण्यासाठी शहर व उपनगरांमधील नागरिक दाखल होत आहेत.
दररोज घरचे पदार्थ खावून कंटाळलेल्या नागरिकांना येथे झणझणीत मिसळ मिळू शकते. काळय़ा रश्श्याची मिसळ, तांबडी मिसळ, हिरवी मिसळ, गावरान मिसळ, कोल्हापुरी मिसळ अशा विविध चवीच्या मिसळ या ठिकाणी खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.
महोत्सवाची आज होणार सांगता
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाची रविवारी सांगता होणार आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने नागरिकांची तुफान गर्दी होणार आहे. झणझणीत मिसळ खाण्याची ही संधी बेळगावच्या नागरिकांना आज शेवटची उपलब्ध होणार आहे.