खरगांव / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील खरगांव येथे हिंदू संघटना आणि असंख्य हिंदू नागरिकांनी विशिष्ट समाजावर आर्थिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या समाजातील व्यक्तींकडून कोणतीही वस्तू विकत न घेण्याचा तसेच त्यांना कोणतीही वस्तू न विकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. खरगांव येथे रामनवमी दिवशी विशिष्ट समाजातील लोकांनी मोठय़ा प्रमाणात दंगल माजवून प्रचंड हिंसाचार केला होता. गावातील अनेक हिंदूंना घरेदारे सोडून पलायन करावे लागले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे येथील हिंदू संघटनांनी स्पष्ट केले.
बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ प्रसारित होत असल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली आहे. बहिष्काराच्या आवाहनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही सांगण्यात येत आहे. विशिष्ट धर्मियांच्या दुकानांमधून कपडे, चप्पल आदी कोणतीही वस्तू विकत न घेण्याची शपथ लोकांना दिली जात आहे. अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे हा संकल्प करीत आहेत, असे दिसत आहे. खरगांवच्या आसपासच्या उबदी, पिपरी आणि इच्छापूर आदी गावांमध्येही अनेकांनी हा संकल्प केला असल्याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने चौकशीचा आदेश दिला आहे. रामनवमीदिवशीच्या दंगलींमुळे विशिष्ट समाजाविरोधात येथे प्रचंड संतापाची भावना आहे. या संतापाचे पर्यवसान आता आर्थिक बहिष्कारात झाले आहे, असे अनेक गावकऱयांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.