प्रतिनिधी / नागठाणे
विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सवर बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली.यावेळी पोलिसांनी १०हजार रुपये दंड वसूल केला.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री १०.३० वा. सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ यांना पाटण येथून एक ट्रॅव्हल्स काही प्रवाशांना घेऊन मुंबईकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सपोनि डॉ.सागर वाघ,हवालदार विशाल जाधव,विजय साळुंखे,सत्यम थोरात यांनी बोरगाव(ता.सातारा) गावचे हद्दीतील बोरजाई मंदिराचे समोर ही ट्रॅव्हल्स थांबवली.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार अत्यावश्यक कारणाशिवाय वाहतुकीस जिल्हाबंदी असताना देखील ट्रॅव्हल्स मधून साधारण ५२ प्रवासी हे पाटण ते मुबंई असा प्रवास करीत असलेचे व त्यांचेकडे ई पास तसेच कोव्हीड टेस्ट रिपोर्ट नसल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाकडे रिपोर्ट तसेच प्रवासी वाहतुकीच्या परवानगीची कागदपत्रे मागणी केली असता त्यांच्याकडेही कोणतीच कागदपत्रे मिळून आली नाही.त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक लालासो लक्ष्मण पवार ( वय.३५, रा.जळव ता.पाटण जि. सातारा) याच्यावर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून जागेवर दंड वसूल करण्यात आला.