कुडणे साखळी येथील घटना. खाणी बंद झाल्याने काम नाही, म्हणून आत्महत्या करीत असल्याचा नोट.
डिचोली/प्रतिनिधी
सुमारे दहा वर्षे खाणी बंद असल्याने हाताला काम नाही, त्यामुळे हवालदिल झालेल्या करमळे कुडणे येथील एका 54 वषीय इसमाने खाण पिटात उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटना काल शुक्र. दि. 8 एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. खाण पिटाच्या परिसरात मिळालेल्या चिठ्ठीत “खाणी बंद पडल्याने काम नाही, त्यासाठी आपण आत्महत्या करीत आहे. आपल्या कुटुंबाला त्रास देऊ नये, असा मजकूर लिहिलेला आहे.
रमेश नाईक असे सदर इसमाचे नाव असून पूर्वी तो येथील साळगावकर खाण कंपनीत कामाला होता. सदर इसम विवाहित आहे. खाणी बंद पडल्यानंतर त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे घर संसार चालविण्यास येणाऱया अडचणी यामुळे तो अस्वस्थ होता असे समजते.
काल सकाळी सदर घटना घडली त्यावेळी सर्वप्रथम रमेश नाईक यांनी लिहिलेली चिठ्ठी मिळली. परंतु मृतदेह सापडला नव्हता. मृतदेहाचा शोध सुरूच होता. अखेर संध्याकाळी 4 वा. नौदलाच्या जवानांनी मृतदेह शोधून पाण्याच्या वर आणला. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याप्रकरणी डिचोली पोलीस अधिक तपास करीत आहे.