दिगंबर कामतने दिले भाजपला आव्हान
प्रतिनिधी /मडगाव
2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर करण्यात आलेला 35000 कोटींचा खाण घोटाळा पीएसी समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिले आहे.
दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर आव्हान फेकण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी खाण घोटाळय़ासंदर्भात गंभीर आरोप केले होते. या आरोपाचा पीएसी अहवाल सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्याच्या काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकरांच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे.
सदर लोकलेखा समितीचा अहवाल कधीही अस्तित्त्वात नसल्याचा माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी आपण लवकरच कागदोपत्री पुरावे जनतेसमोर ठेवणार आहे. तथाकथित रु. 35000 कोटींचा खाण घोटाळा म्हणजे भाजपचे फसवे कृत्य असल्याचा आरोप दिगंबर कामत यांनी केला आहे. आपण देवाची भीती बाळगणारी व्यक्ती आहे आणि माझा विश्वास आहे की, सत्याचा नेहमी विजय होतो. आपल्याला आशा आहे की, भाजप आता काही तथ्ये आणि आकडेवारी जनतेसमोर ठेवणार आहे.