नंदगड त्या मधील बाधित महिलेचा मृत्यू : तालुक्यातील मृतांची संख्या तीन
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यामध्ये मंगळवारी कोरोना बाधितचा आकडा 11ने वाढला असतानाच नंदगड मधील एका 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा आज पहाटे बेळगाव बीम्स मध्ये मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी झाला आहे. सदर कोरोना बाधित महिलेच्या पतीचा दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर सदर 65 वर्षीय महिला ताण पडल्याने दोन दिवस आजारी होती. सोमवारी तिला बेळगाव बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता. तिचा स्वाब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्या ठिकाणी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचा अहवाल आजच्या बुलेटीन मध्ये प्रसिद्ध झाला. तिचा आज पहाटेच बेळगाव बीम्स मध्ये मृत्यू झाल्याची बातमी पसरली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात कोरोना बाधितांची मृतांची संख्या तीन वर पोहोचली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी, पीएसआय उस्मान अवटी, पीडीओ गणेश कलाले यांनी भेट देऊन सदर महिलेच्या घरचा परिसर सील केला आहे.
खानापूर तालुक्यावर दिवसेंदिवस कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या बुलेटीन नुसार तालुक्यात 11 जणांना कोरोनाची लागण झाली असून तालुक्यातील आतापर्यंत एकूण संख्या 56 वर पोहोचली आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह आलेल्या 11 मध्ये 7 महिला, 4 पुरुषांचा समावेश आहे.यामध्ये खानापूर शहरांमध्ये वाढता आकडा असून विद्यानगर मध्ये चार जणांना लागण झाली आहे. त्यामध्ये अनुक्रमे 40, 42 वर्षीय महिला व 15 वर्षीय अल्पवयीन युवतीचा तर एक 21 वर्षीय युवकाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खानापूर आश्रय कॉलनीमध्ये एक 40 वर्षीय महिला, खानापूर शहरात 50 वर्षीय महिला व खानापूर बस आगारात एक 24 वर्षीय मेकॅनिकचा समावेश आहे. तसेच नंदगड येथे एक 62 वर्षीय महिला, लोंढा येथे 32 वर्षीय पुरुष, हलकर्णी येथे 24 वर्षीय महिला तर लैला शुगर कारखाना साइटवर 18 वर्षीय युवकाचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 56 वर पोचली असून त्यापैकी पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर तिघांचा मृत्यू झाला आहे.