सोमवारी नगरपंचायतीची अचानक धडक कारवाई : खोकीधारकांतून तीव्र नाराजी
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहरातील स्टेशनरोडवर मिनी विधानसौध, सरकारी दवाखाना परिसरात मुख्य रस्त्याच्या बाजुला गेल्या काही वर्षापासून अनधिकृत खोकी थाटण्यात आली होती. सदर खोकी काढावीत यासाठी दोन महिन्यापूर्वी या खोकीधारकांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. अखेर सोमवारी सायंकाळी नगरपंचायतीने ही अनधिकृत खोकी काढण्यास सुरुवात करताच संबंधित खोकीधारकांनी स्वतःहून आपल्या खोक्यांमधील साहित्य व खोकी हटविण्यास प्रारंभ केले. जवळजवळ चार तास ही कारवाई सुरू होती. रात्री दहा वाजेपर्यंत सर्व जागा खाली करण्यात आली.
मुख्य स्टेशन रोडवरील मिनी विधानसौध तसेच सरकारी दवाखान्याच्या आवारा भिंतीला लागून सदर खोकी घालण्यात आली होती. यामध्ये हॉटेल व्यवसाय, स्टँप विक्री तसेच इतर व्यवसाय थाटण्यात आले होते. ही अनधिकृत खोकी काढावीत यासाठी यापूर्वी एक दोन वेळा प्रयत्नही झाले. अखेर दोन महिन्यापूर्वी संबंधित खोकीधारकांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. पण त्यांनी खोकी काढली नाहीत. यामुळे प्रांताधिकाऱयांनी दिलेल्या आदेशानुसार नगरपंचायतीने सोमवारी सायंकाळी 6 वाजता अचानकपणे ही खोकी काढण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनच्या नियमामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व खोकी बंदच होती. सायंकाळी खोकी हटविण्यात येत असल्याचे समजताच सर्व खोकीधारक त्या ठिकाणी आले. काहींनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण काही खोकीधारकांनी स्वतःहून खोकी काढून घेतली व केवळ चार तासामध्ये सर्व जागा खाली झाली.या परिसरात साधारणपणे 20 ते 25 खोकी होती. या कारवाईमुळे खोकीधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.