प्रतिनिधी/ पर्वरी
पर्वरी पोलीस क्षेत्रातील नेरूल येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना खासगी टॅक्सीवाले व चित्रीकरण करणाऱया ठेकेदारामध्ये झालेल्या हमरीतुमरीत टॅक्सीवाल्यांनी तेथे असलेल्या अकरा वाहनांच्या दर्शनी काचेची नासधूस केली. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी तिघाजणांना अटक करून नंतर जामिनावर सोडले.
नेरूल येथील झेनिफर व्हिला येथे बालाजी टेलिफिल्म प्रॉडक्शनचे चित्रीकरण शुक्रवार 23 रोजी करण्यात येत होते. टेलिफिल्म प्रॉडक्शनसाठी काम करणाऱया कलाकारांची ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यासाठी भाडेपट्टीवर वाहने आणण्यात आली होती. खासगी टॅक्सवाल्यांचा संप असल्यामुळे या भागातील टॅक्सी चालकांनी चित्रीकरण स्थळी येऊन ठेकेदाराकडे वाहनासंबंधी वाद उरकून काढला. त्यावेळी झालेल्या वादावादीनंतर प्रकरण हातघाईवर येऊन टॅक्सीवाल्यांनी अकरा वाहनांची नासधूस केली, असे ठेकेदार मुकेश इजदिवे यांनी पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
टॅक्सीचालक लक्ष्मण कोरगावकर उर्फ बाप्पा विशाल खांडेपारकर, सुनील नाईक व इतर 17 जणांनी वाहनांची नासधूस केली, असे तक्रारीत नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी लक्ष्मण कोरगावकर (बाप्पा), सुनील नाईक व विशाल खांडेपारकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून काल शनिवारी त्यांना अटक केली. तिन्ही संशयितांना म्हापसा न्यायदंडाधिकाऱयांसमोर उभे केले असता जामिनावर सोडण्याचा आदेश मंजूर झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर यांनी कारवाई केली. पुढील तपास चालू आहे.