483 खासगी रुग्णालयात होणार मोफत उपचार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. काही रुग्णांना सौम्य तर काहींना तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने विशेष खासगी रुग्णालयांची सोय केली आहे. त्यानुसार राज्यातील 483 खासगी रुग्णालयात बाधितावर मोफत उपचार केले जाणार आहेत.
सध्या बहुतेक रुग्ण सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून काही रुग्ण खासगी रुग्णालयातही आहेत. तथापि, प्रत्येक कोरोना रुग्णाची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य प्रशासनाला देणे खासगी रुग्णालयांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारस्थापित सुवर्ण आरोग्य सुरक्षा विश्वस्त संस्थेने खासगी रुग्णालयांबरोबर विस्तृत चर्चा करून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय केली आहे. या विश्वस्त संस्थेशी संलग्न असलेल्या काही खासगी रुग्णालयांशी करारही केला आहे.
अशा करार केलेल्या रुग्णालयांची सूची सरकारने प्रसिद्ध केली आहे. या खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे-
@खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेंगळूर महापालिका आयुक्त, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा संचालक, डीएचओ, डीएलओ यांनी अनुमती देणे आवश्यक आहे. याच प्राधिकरणाकडून खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठविण्यात येतील.
@रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्वरित रुग्णाची सर्व माहिती सुवर्ण आरोग्य सुरक्षा विश्वस्त संस्थेला देण्यात आली पाहिजे व त्वरित रुग्णांवर उपचार करावा.
@सरकारने वेळोवेळी घोषित केलेली मार्गदर्शक तत्वे उपचार करताना अनिवार्यपणे अंमलात आणली पाहिजेत.
@रुग्णांवरील उपचाराचा खर्च ठरलेल्या पॅकेज दरानुसार सरकारकडून रुग्णालयांना देण्यात येईल. रुग्णाला अन्य काही आजार असल्यास अतिरिक्त पॅकेज देण्यात येईल.