बापट गल्ली येथील घटनेने खळबळ, बंडू केरवाडकर विरुध्द गुन्हा
प्रतिनिधी / बेळगाव
10 टक्के व्याजाने दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी खासगी सावकाराने सतत जाच दिल्याने बापट गल्ली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
विजय मनोहर गवाणे (वय 35, रा. बापट गल्ली) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विजय हा बापट गल्ली येथील सुरेखा अप्सेट ऍन्ड ग्राफीक प्रिटींग प्रेसमध्ये काम करत होता. आपण काम करीत असलेल्या ठिकाणी त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. यासंबंधी बंडू केरवाडकर (रा. वडगाव) याच्या विरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खडेबाजार पोलीस स्थानकासमोर नातेवाईकांची गर्दी झाली होती.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये विजय गवाणे या युवकाने बंडू केरवाडकर यांच्याकडून 10 टक्के व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. व्याज देण्यास विलंब झाला तर दुप्पट व्याज वसुल केला जात होता. परिस्थितीमुळे व्याज व मुद्दल थकल्यामुळे व्याज देण्यासाठी बंडू केरवाडकर कडून धमकावण्याचे प्रकार सुरू झाले.
पैसे देता आले नाही तर जावून जीव दे….
शुक्रवारी सकाळी 8 ते 8.30 यावेळेत बंडू हा विजयच्या घरी आला होता. पैसे देता आले नाही तर कुठे तरी जावून जीव दे असे सांगत अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली. याच मनस्तापातून आपल्या पती विजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पत्नी मेघना हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. भा.दं.वि. 306, 506 बरोबरच व्याजी धंदा प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी विजयने चिठ्ठी लिहून ठेवली असून चिठ्ठीतील मजकुरानूसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.