प्रतिनिधी /फोंडा
नियमित व्यायाम व पुरेशी झोप या दोन गोष्टी आपण कटाक्षाने पाळतो. मात्र प्रचाराच्या धामधुमीत व्यायाम सोडाच पण चार तासही व्यवस्थित झोपता आले नाही. त्यामुळे सोमवारी मतदान होताच दुसऱया दिवशी कार्यकर्त्यांना सक्तीने विश्रांती घ्यायला लावली व आपण मंगळवारचा पूर्ण दिवस झोपून काढला. फोंडय़ातील मगोचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी मतदानानंतरचा दुसरा दिवस असा घालवला.
मंगळवारी दुपारी थोडा वेळ कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा पूर्ण दिवस विश्रांती घेतली. मागील दोन महिने सकाळच्या सत्रात घरोघरी प्रचार व सायंकाळी बैठका, असा एकंदरीत व्यस्त दिनक्रम होता. या काळात वेळेत जेवण नाही किंवा रात्री पुरेशी झोप मिळत नसल्याने आरोग्य सांभाळण्यासाठी पूर्ण शाकाहार पाळला. सकाळच्यावेळी प्रोटिन्स व रात्री हायड्रेशन पावडर सुरु केला. दिवसाकाठी पाच ते सहा लिटर पाणी, असा एकंदरीत आहाराचा नियम होता. फिजिओथेरेपी क्लिनिकडे सहा महिने पूर्ण दुर्लक्ष झाले. मतदारांचा एकंदरीत कल आपल्याच बाजूने आहे. त्यामुळे मतदानानंतर शांत झोप लागली. येत्या 10 मार्च रोजी निकाल पाहून प्रतिस्पर्धी उमेदवारांची झोप उडणार हे निश्चित. यावेळी रायझिंग फोंडा होणार असे डॉ. भाटीकर यांनी सांगितले.