प्रतिनिधी/ खेड
शहरातील शिवतररोड येथील नाडकर आर्केड अपार्टमेंटमधील अक्षय अशोक खेडेकर यांच्या फ्लॅटला शुक्रवारी सकाळी 8च्या सुमारास आग लागली. या आगीत विद्युत उपकरणांसह घरातील साहित्य जळून खाक झाले. तासाभरातच आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत एक लाख 92 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
खेडेकर कुटुंबीय चार सदस्यांसह राहतात. शुक्रवारी सकाळी अचानक घरात धुराचे लोट पसरले. आगीचा भडका उडताच घरातील सदस्य तातडीने घराबाहेर पडले. अक्षय हे आग आटोक्यात आणण्यासाठी घरातच थांबले होते. आगीच्या ज्वाळांमागोमाग फ्रीजचा स्फोट झाला. आगीत घरातील अन्य विद्युत उपकरणांसह स्वयंपाकघरातील साहित्य बेचिराख झाले. फ्लॅटला आग लागल्याचे वृत्त परिसरात पसरताच मदतकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले.
आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेविका रूपाली खेडेकर, माजी उपनगराध्यक्ष वैभव ना. खेडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे व अन्य मदतकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. अग्निशामक दलाचे शाम देवळेकर, दीपक देवळेकर, पियुष माने, चालक वैभव खामकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खबरदारी म्हणून सर्वप्रथम घरात असलेले तीन सिलिंडर तातडीने बाहेर काढण्यात आले.
आगीची झळ अन्य कुटुंबीयांना पोहोचण्याच्या शक्यतेने तेथील सारे रहिवासी घराबाहेर पडले. तासाभरानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे शिवतररोड मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.