खेड /प्रतिनिधी
मुंबईहून गावी आलेल्या एका 71 वर्षीय वृद्धेचा काल, सोमवारी (दि.13) मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. साऱ्या बाबींची पडताळणी केल्यानंतर वृद्धेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला.
तालुक्यातील संगलत बौद्धवडी येथील रहिवासी असलेली ही वृद्ध मुंबई येथे वास्तव्य होती. ती दीर्घकाळ तेथे आजारीच होती. मात्र तिची प्रकृती गंभीर बनल्याने एका रुग्णवाहिकेच्या सहाय्याने गावी आणण्यात आले. मात्र गाव गाठताच तिचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मृत्यूने एकच तारांबळ उडाली. आरोग्य आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर आरोग्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तिचे सर्व वैदकीय अहवाल तपासल्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न होताच साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. यानंतर सायंकाळी उशिरा प्रांताधिकार्यांनी वृद्धेच्या अंत्यसंस्कारास परवानगी दिली. या वृद्धेस ज्या रुग्णवाहिकेतून आणण्यात आले त्या रुग्णवाहिकेतून अन्य चौघांनी प्रवास केल्याची बाब पुढे आली आहे. त्यानुसार या चौघांची विभागाकडून सायंकाळी उशिरापर्यंत प्राथमिक तपासणीच्या हालचाली सुरू होत्या.