चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा गौरव : राज्यस्तरीय क्रीडा भारती संस्था आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत सुयश
वार्ताहर /चापगाव
विद्यार्थ्यात जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे. याचबरोबर शिक्षकांकडून योग्य प्रशिक्षण व ज्ञानदानाची भर दिल्यास गुणात्मक शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यात वेळ लागत नाही. दक्षिण महराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूलच्या स्थापनेनंतर अनेकवेळा क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. नुकताच झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा भारती संस्थेच्यावतीने आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उंचावले असून अशीच प्रेरणा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावी व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे विचार शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱहाडे यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनपर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक व्ही. बी. होसूर यांनी करून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल माहिती दिली. जिल्हास्तरीय स्पर्धेत 40 माध्यमिक विद्यालय अंतर्गत संघांनी भाग घेतला होता. त्यामध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत यश संपादन केले. यासाठी शाळेच्या काही शिक्षकांनीही अथक परिश्रम केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे
यावेळी शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा झाली. शाळेतील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य नागराज येळळूरकर यांनी 500 लिटर क्षमतेचा जलकुंभ बसवून देण्याचे आश्वासन दिले. नागराज यांचे योगदान शाळेच्या प्रगतीसाठी उत्तरोत्तर मार्गदर्शन ठरले असून नागराज यांनी मलप्रभा हायस्कूलला उत्तम रेल्वे लूक देणारे रंगकाम तसेच 1 एलईडी टीव्ही घेऊन यापूर्वी सहकार्य केले आहे. तसेच लोकोळी ग्रामपंचायत सदस्य रमेश हंगीरगेकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश देऊन प्रोत्साहित केले आहे. असेच सहकार्य शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील करावे, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष स्नेहल सयाजी पाटील, उपाध्यक्ष मारुती चोपडे, यडोगा ग्रामपंचायत सदस्य रमेश हंगीरगेकर, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य विजय कडबी, राजाराम जांबोटकर, पांडुरंग पाटील, रमेश घारशी, सुभाष तोरगल, महादेव हंगीरगेकर, यडोगा येथील माजी ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा अंधारे यासह शाळेचे सहशिक्षक, पालक वर्ग उपस्थित होते. सहशिक्षक तुकाराम सनदी यांनी आभार मानले.