मसूर / प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील खोडशी येथे नदीकाठी लावलेल्या वाघरीत बिबट्याचे पिल्लू अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वनविभागाने तात्काळ त्या बिबट्याला जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील खोडशी येथे नदीकाठी असलेल्या सावकर वस्ती शिवारात शिकारीसाठी वाघर लावण्यात आली होती. त्यामध्ये फासकी ठेवण्यात आली होती. त्यात सुमारे एक वर्षे वयाच्या बिबट्या अडकला होता. ही घटना काही शेतकऱ्यांच्या लक्षात मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास आली. त्यानंतर गावातील पोलीस पाटील यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वन विभागाचे पथक सकाळी आठच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या बिबट्याला जेरबंद करून वराडे येथे नेले असल्याचे समजते. ही घटना समजताच खोडशी गावासह परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.