खोतीगाव, मार्ली भागांतील संतप्त नागरिकांचा चेकनाक्यांवर घेराव, अभयारण्य विभागाच्या वनाधिकाऱयाने दुर्लक्ष केल्याचा ठपका, निलंबित करण्याची मागणी
प्रतिनिधी / काणकोण
खोतीगावच्या अभयारण्य विभागात वॉर्डन म्हणून काम करणारा खोतीगाव येथील योगेश बी. वेळीप शनिवार 27 पासून बेपत्ता असून ही घटना घडून 24 तास उलटले, तरी सदर व्यक्तीचा शोध घेण्याच्या बाबतीत वन खात्याच्या अभयारण्य विभागाचे अधिकारी विक्रमादित्य गावकर यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून खोतीगाव, मार्ली भागांतील 400 पेक्षा अधिक नागरिकांनी हत्तीपावल आणि वेदुमळ चेकनाक्यांवर जमून घेराव घातला आणि आंदोलनाचा इशारा दिला.
मूळ पणसुलेमळ-खोतीगाव येथील रहिवासी असलेला योगेश अभयारण्य विभागात मागच्या 8 वर्षांपासून वॉर्डन म्हणून काम करत असून तो विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा आहे. वेदुमळ चेकनाक्यावर काम करत असताना नेहमीप्रमाणे तो 27 रोजी कामावर आला, मात्र त्याचदिवशी दुपारनंतर तो बेपत्ता झाला. त्याची दुचाकी आणि सामानाची बॅग चेकनाक्यावरच असल्याची माहिती त्याचा भाऊ दशरथ वेळीप याने काणकोणच्या पोलीस स्थानकावर तक्रार करतेवेळी दिली आहे.
योगेश कामावर असताना बेपत्ता झाल्याची खबर मिळताच पणसुलेमळ आणि मार्ली-तिर्वाळच्या नागरिकांनी 27 रोजी रात्रभर जंगलात तपास केला. काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक, उपनिरीक्षक स्वदेश देसाई, रामचंद्र नाईक आणि अन्य पोलीस कर्मचाऱयांनी याबाबतीत सहकार्य केले. मात्र ज्या वन अधिकाऱयाची जबाबदारी होती त्यांनी कानावर हात ठेवले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संतप्त नागरिकांनी दोन्ही चेकनाक्यांवर गर्दी करून वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी येऊन जाब द्यावा, अशी मागणी केली.
उपसभापती, सांगे आमदारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
या घटनेची खबर मिळताच उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, सांगेचे आमदार प्रसाद गावकर, आम आदमी पक्षाचे संदेश तेलेकर, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर, लोलयेचे पंच निशांत प्रभुदेसाई, खोतीगावचे पंच यानी चेकनाक्यावर येऊन संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
वन खात्याचे अधिकारी दाखल
हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपसभापती फर्नांडिस यांनी वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधला. अखेर वन खात्याचे उपवनपाल प्रेम कुमार, साहाय्यक वनपाल दामोदर सालेलकर यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची समजूत काढली आणि बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याची मोहीम 27 पासूनच हातात घेण्यात आली असल्याचे सांगितले.
अधिकाऱयाच्या निलंबनाची मागणी
अभयारण्य विभागात काम करणारी एक व्यक्ती बेपत्ता झालेली असताना खात्याचे अधिकारी बेफिकीरपणे वागतात ही अत्यंत शरमेची गोष्ट असल्याचे मत उपसभापती फर्नांडिस, आमदार गावकर आणि तेलेकर यांनी मांडून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर ज्या अधिकाऱयाची ही नैतिक जबाबदारी होती ते आपली जबाबदारी झटकून टाकतात हे बरोबर नसून अशा व्यक्तीला त्वरित निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
तत्काळ तपास सुरू करण्याचे आश्वासन
यावेळी उपस्थित असलेले उपवनपाल प्रेम कुमार आणि साहाय्यक वनपाल सालेलकर यांनी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन रात्रीपासूनच तपासकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची मागणी केली. सदर चेकनाक्यावर काम करणाऱया कर्मचाऱयांना कसल्याच सुविधा दिल्या जात नाहीत. एकाच कर्मचाऱयाकडून चेकनाका सांभाळला जातो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा देण्याची मागणी उपसभापती फर्नांडिस यांनी यावेळी केली. यावेळी फर्नांडिस, तवडकर तसेच आमदार गावकर यांनी संतप्त नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला नसता, तर या ठिकाणी शांतताभंग होण्याची शक्यता होती.