साळवण / वार्ताहर
पन्हाळा तालुक्यातील बोरगावमधून बेपत्ता झालेल्या महिलेची हत्या झाली आहे. छबुताई केरबा पाटील वय 58 असे मृत महिलेचे नाव आहे. गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी येथे कुंभी नदीकाठी झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी प्रकाश सदाशिव कुंभार (वय 35) रा. असंडोली ता. गगनबावडा या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश कुंभार हा कर्जबाजारी आहे. पैशाच्या हव्यासापोटी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह निर्जनस्थळी टाकला. मृतदेह मार्गेवाडीतील जाळीचा माळ परिसरात झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, छबुताई पाटील या 6 मार्चपासून बेपत्ता होत्या.