विनायक चतुर्थीनिमित्त अनेक घरांतून उद्या एक दिवसाचे गणेश पूजन
प्रतिनिधी / दोडामार्ग:
सिंधुदुर्गात गुरुवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. अनेक सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात झाली आहे. विशेष म्हणजे या नवरात्रोत्सवात काही घरांमधून गणपती बाप्पांचेही शनिवारी आगमन होणार आहे. एक महिन्यानंतर पुन्हा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू येणार आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये गणेशचतुर्थी दिनी गणरायाचे आगमन होत असते. भाद्रपद महिना संपल्यानंतर आश्विन महिन्यातील पहिल्याच दिवशी घटस्थापना करून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. ठिकठिकाणी दुर्गामातेचे पूजन, आरती, दांडिया, गरबासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला. आता या नवरात्रोत्सवात ‘दुर्गे दुर्घट भारी’ या आरती सोबत गणपती बाप्पाची ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरतीही दुमदुमणार आहे.
साजरा होणार एक दिवसाचा गणेशोत्सव
गणेशचतुर्थी कालावधीत ‘सुयेर-सुतक’ तसेच अन्य एखाद्या घटनेने अथवा तत्सम कारणांमुळे अनेकांना गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करून पूजाअर्चा करता येत नाही, अशा सर्वांसाठी आश्विन महिन्यातील ‘विनायक चतुर्थी’ हा दिवस महत्वपूर्ण ठरतो. वरील दर्शविलेल्या घटनांमुळे ज्यांच्या घरी भाद्रपद चतुर्थी दिनीचे गणेशपूजन होऊ शकले नाही, त्या सर्वांना विनायक चतुर्थी दिनी गणपती पूजन करता येते. नियमित गणेश चतुर्थीप्रमाणे सकाळी मोठय़ा उत्साहात गणपती बाप्पांना घरी आणून त्यांची विधीवत पूजाअर्चा, तीर्थप्रसाद, आरती तसेच मोदकांचा नैवैद्य मोठय़ा भक्तीभावाने अर्पण केला जातो व सायंकाळी त्यांना भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो. शनिवारी, नऊ ऑक्टोबर रोजी अनेक ठिकाणी हे गणेशपूजन होणार असून त्यांच्या घरी गणरायाच्या स्वागताची जल्लोषात तयारी सुरू आहे.