दुकानांच्या तुटपुंज्या भाडेपट्टीवर लिलावाविषयी होणार होती चर्चा : काँग्रेस-गोवा फॉरवर्डचे बहुतेक नगरसेवक गैरहजर
प्रतिनिधी /मडगाव
गांधी मार्केटमधील दोन दुकानांचा लिलाव तुटपुंज्या भाडेपट्टीवर केल्याने यासंदर्भात झालेल्या प्रक्रियेची अतिरिक्त माहिती जाणण्यासाठी मडगाव पालिका मंडळाची खास बैठक सोमवारी सकाळी बोलाविली असता पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षांशी सलग्न बहुतेक नगरसेवकांनी दांडी मारल्याने भाजप व अन्य मिळून दहाच नगरसेवक उपस्थित राहिले आणि नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी गणपूर्तीच्या अभावी बैठक तहकूब केली.
सत्ताधारी काँग्रेस व गोवा फॉरवर्डशी संलग्न नगरसेवकांनी जाणूनबुजून या बैठकीला दांडी मारली. त्यांना माहीत होते की, लिलाव प्रक्रिया योग्य प्रकारे राबविण्यात आलेली नाही आणि या विषयावर उघडे पडणार. यामुळे त्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरच्या सांगण्यावरून बैठकीला उपस्थिती लावली नाही, अशी टीका स्वतंत्र नगरसेवक महेश आमोणकर यांनी केली.
वरील विषयावर खास बैठक घ्यावी म्हणून सत्ताधारी गटातील गोवा फॉरवर्डशी संलग्न पूजा नाईक, रवींद्र नाईक, फ्रान्सिस जोनास, व्हितोरिनो तावारीस, राजू नाईक यांनी सहय़ा केल्या होत्या. तसेच काँग्रेसच्या लता पेडणेकर व सीताराम गडेकर यांनी केलेल्या सहय़ा नंतर खोडण्यात आल्या होत्या. हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना नजरेस आणून दिले.
नगरसेवकांनी बालिशपणा दाखविला : शिरोडकर
या नगरसेवकांनी बैठकीला उपस्थिती न लावता आपला बालिशपणा दाखवून दिला आहे. राजकीय गॉडफादरच्या सांगण्यावरून बैठकीवर नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याचे आपण म्हणणार नाही, कारण ते दूध पिणारे बाळ नाहीत. त्यांनी या विषयावर आपली बाजू बैठकीला उपस्थिती लावून मांडणे आवश्यक होते. पटत नसल्यास मतदान करण्याचा अधिकार त्यांना होता. मात्र तसे न करून त्यांनी बालिशपणा दाखविला आहे, अशी टीका शिरोडकर यांनी केली.
यापूर्वी मडगावातील शिमगोत्सवासंदर्भात मडगाव पालिकेची खास बैठक बोलविण्यात आली असता सदर बैठक पार पडल्यानंतर नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी गांधी मार्केटमधील पालिकेच्या मालकीच्या सदर दुकानांची लिलाव प्रक्रिया नियमांस धरून नसल्याचा मुद्दा उठविला होता. तुटपुंजी भाडेपट्टी ठरवून कोणत्या आधारे त्यांचा लिलाव करण्यात आला आणि 15 ते 20 हजार रु. भाडे गांधी मार्केटमध्ये मिळत असताना वरील तुटपुंज्या भाडय़ासाठी पालिका कशी राजी झाली असे सवाल त्यांनी केले होते. यावेळी मार्केट समिती अध्यक्षा असलेल्या उपनगराध्यक्षा दिपाली सावळ यांना जाब विचारण्यात आला होता तसेच नगराध्यक्ष पेरेरा यांनी फाईलवर सही केलेली असल्याने शिरोडकर तसेच मार्केट समितीचे सदस्य असलेले नगरसेवक राजू नाईक, महेश आमोणकर, जॉनी क्रास्टो व सगुण नाईक यांनी नगराध्यक्षांना फैलावर घेतले होते.
पालिका संचालक, दक्षता खात्याकडे चौकशीची मागणी करणार
लिलावासंदर्भातील विषय आम्ही पालिका संचालक तसेच दक्षता खात्याच्या निदर्शनास आणून देणार असून यासंदर्भात चौकशीची मागणी करणार असल्याचे शिरोडकर, आमोणकर व भाजपाशी संलग्न गटाचे सदानंद नाईक या नगरसेवकांनी स्पष्ट केले.