प्रमोद मुतालिक यांचा सरकारला इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या उत्सवाशी भक्तांच्या भावना, भक्ती जोडली गेली आहे. त्यामुळे या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करू नये. कोरोनाच्या नावाखाली गणेशोत्सव साजरा करण्यावर घातलेले निर्बंध मागे न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला.
बुधवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार एकीकडे गणेशोत्सवावर निर्बंध घालत असताना दुसरीकडे मात्र मनपाच्या निवडणुका घेण्यास तयारी करीत आहे. गणेशोत्सवामुळे जर कोरोनाचा फैलाव होत असेल तर निवडणुकीमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात भाजपचे सरकार असतानाही हिंदू सणांवर निर्बंध घालण्याचे प्रकार हे निंदनिय आहेत. राजकीय कार्यक्रमांना परवानगी मिळत असेल तर गणेशोत्सवही थाटात साजरा होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले..