मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
गणेशोत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यास परवानगी देण्याबाबत तज्ञांशी चर्चा करण्यात येईल. 30 ऑगस्ट रोजी कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत चर्चा केल्यानंतर गणेशोत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यास परवानगी द्यावी का?, यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे.
बेंगळूरच्या आर. टी. नगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी दबावही आणला जात आहे. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेविषयी चर्चा करण्यासाठी तज्ञांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत गणेशोत्सवाविषयी देखील चर्चा करण्यात येईल. तज्ञांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोना परिस्थितीमुळे राज्य सरकारने गणेशोत्सवासह इतर सण सार्वजनिकपणे साजरा करण्यावर निर्बंध घातले आहेत. याला सत्ताधारी भाजपमधील आमदार, खासदारांनी आक्षेप घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लादण्यात आलेले निर्बंध हटविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.