छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंडहून भारतात आणण्यासाठी वेधले लक्ष
प्रतिनिधी / पुणे, कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्रजांनी 1875 मध्ये कोल्हापुरात इंग्लंडला नेलेली जगदंब तलवार सध्या इंग्लंडच्या महाराणीच्या वैयक्तिक संग्रहात आहे. ती तलवार पुन्हा भारतात आणण्यासाठी कोल्हापूरच्या शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाकडून मागणी आणि पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात राज्य व केंद्र सरकारबरोबर छत्रपती घराण्यातील मान्यवरांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याबरोबरोबर इंग्लंडच्या महाराणीचेही लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सोमवारी हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये घुसून खेळपट्टी उकरण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. सुर्वे यांच्यासह पाच जणांना तळेगाव पोलिसांनी अटक केली.
जगदंब तलवार भारतात परत आणण्यासाठी शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, इतिहासाचे अभ्यासक यांच्याकडून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्नशिल आहेत. सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱयावर आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत आणि् इंग्लंड यांच्यातील क्रिकेट सामने होणार आहे. त्याआधी इंग्लंड संघाबरोबर इंग्लंडच्या महाराणी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे कार्यकर्ते सोमवारी गहुंजे स्टेडियमवर घुसले. भगवा झेंडा घेऊन जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत जगदंब तलवार तातडीने भारतात आणण्याची मागणी करत खेळपट्टीच्या दिशेने कूच केले. स्टेडियमवरील सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना खेळपट्टीकडे जाण्यापासून रोखले. यावेळी खेळपट्टीभोवती सुरक्षारक्षकांनी कडे केले होते. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हर्षल सुर्वे यांच्यासह प्रदीप हंडे, विजय दरवान, चैतन्य अष्टेकर, देवेंद्र सावंत आदी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अटक करून त्यांना तळेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार जो पर्यंत भारतात येत नाही, तो पर्यंत शिवदुर्ग संवर्धनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू राहणार आहे. इंग्लंडचा सामना भारतात, महाराष्ट्रात होऊ देणार नाही. – हर्षल सुर्वे, शिवदुर्ग संवर्धन आंदोलन