गोकाक येथे जिल्हा सीईएन विभागाची कारवाई : कार, दुचाकी, 600 ग्रॅम गांजा, पन्नीसह 5 मोबाईल संच जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
गोकाक येथे गांजा व पन्नी विकणाऱया चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी शनिवारी ही कारवाई केली असून यामध्ये बेळगावातील तिघा जणांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून एक कार, एक दुचाकी, पाच मोबाईल, गांजा व पन्नी जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या चौघा जणांविरुद्ध गोकाक शहर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळून 600 ग्रॅम गांजा, पन्नीच्या 87 पुडय़ा, केए 51 एमसी 0787 क्रमांकाची कार, केए 49 डब्ल्यू 8018 क्रमांकाची दुचाकी, पाच मोबाईल संच जप्त करण्यात
आले.
अब्दुल खादीर ऊर्फ जिया अतिकउर रेहमान नाईक, रा. महांतेशनगर, मोहसीन अब्दुलमजीद जमादार, रा. पंतबाळेकुंद्री, सलमान रफिक मुल्ला, मूळचा रा. शगनमट्टी, सध्या रा. तारिहाळ रोड, हलगा, अरबाज इस्माईल शाहबाजखान, रा. मोमीन गल्ली, गोकाक अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. बेळगाव परिसरातील तिघे जण कार व दुचाकीवरून अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शनिवारी गोकाकला पोहोचले होते. सरकारी विश्रामधामच्या प्रवेशद्वाराजवळ गोकाकच्या अरबाजला अमली पदार्थांची विक्री करण्यात येत होती. याची माहिती मिळताच सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी छापा टाकला.
गोकाकचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नाईक, जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक वीरेश दोडमनी, उपनिरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, एस. आर. माळगी, वाय. व्ही. सप्तसागर, एम. बी. कांबळे, जी. एस. लमाणी, एन. आर. पडय़ाप्पन्नवर, गोकाक शहर पोलीस स्थानकातील आर. एन. मुरनाळ आदींनी छापा टाकून चौघा जणांना अटक केली.