ब्रिटनच्या कंपनीच्या अपेक्षेहून अधिक किंमत
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये महात्मा गांधी यांचा सोन्याचा मुलामा देण्यात आलेला चष्मा लिलावात 2.6 लाख पौंडमध्ये (सुमारे 2.55 कोटी रुपये) विकला गेला आहे. 4 आठवडय़ांपूर्वी आमच्या पत्रपेटीत हा चष्मा मिळाला होता. हा चष्मा ठेवून जाणाऱया व्यक्तीच्या नातलगाला स्वतः गांधींनीच चष्मा भेटीदाखल दिला होता, अशी महिती ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन हाउसने सांगितले आहे.
गांधींनी हा चष्मा 1920 किंवा 1930 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश पेट्रोलियममध्ये काम करणाऱया एका व्यक्तीला दिला होता. चष्म्याच्या लिलावातून 15 हजार पौंड मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली होती, असे ऑक्शन हाउसने म्हटले आहे.
ज्या व्यक्तीकडे हा चष्मा होता, त्याच्याशी झालेल्या संभाषणाचा लिलावकर्ते ऍन्ड्रय़ू स्टोव यांनी खुलासा केला आहे. चष्मा चांगला न वाटल्यास तो फेकू शकता असे त्या व्यक्तीने म्हटले होते. 15 हजार पौंडपर्यंतची रक्कम मिळू शकते असे म्हटल्यास संबंधित व्यक्ती चकित झाल्याचे स्टोव यांनी सांगितले आहे.