न्यायालयाने केली जामीनावर मुक्तता
उचगांव / वार्ताहर
दुकानासमोर बांधलेल्या कठड्याची तक्रार ग्रामपंचायतीस का केलीस, म्हणून लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी झारीने मारहाण करून अनिल ठकनमल विधानी (वय ४८ रा. राजशंकर अपार्टमेंट, गांधीनगर) यांना जखमी केल्या प्रकरणी शुक्रवारी गांधीनगर पोलीसांनी चार जणांना अटक करुन व्हीसीद्वारे न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
चंदू वल्लभदास भाटिया, रवी चंदू भाटिया, मनिष चंदू भाटिया, मोहीनी चंदु भाटीया (सर्व रा.गांधीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील सिंधु मार्केट रोडवर अनिल विधानी यांचे सीडीचे दुकान आहे. त्यालगतच चंदु वल्लभदास भाटीया यांच नाष्ट्याचं दुकान आहे. चंदु यांनी दुकानाचा कट्टा रस्त्यावर बांधला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडचण होत असल्याने अनिल विधानी यांनी ग्रामपंचायतमध्ये तक्रार देऊन रस्त्यावरील कट्टा काढण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायतीने भाटीया यांना नोटीस लागु करताच चंदू वल्लभदास भाटिया, रवी चंदू भाटिया, मनिष चंदू भाटिया, मोहीनी चंदु भाटीया आणि त्यांचा अल्पवयीन कामगार अशा पाच जणांनी अनिल विधानीला तक्रार का केलीस, असा जाब विचारत लोखंडी झारी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांना तात्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. यातील चार जणांना गांधीनगर पोलीसांनी अटक केली. त्यांना व्हीडीओ काँन्सफ्रन्स द्वारे न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. अधिक तपास पोलिस नाईक सुनिल गायकवाड करत आहेत.