226 रक्तदात्यांनी केले रक्तदान
प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव व इंडियन रेडक्रॉस बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गांधीजयंतीचे औचित्य साधून महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महावीर भवन येथे झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये 226 हून अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या नागरिकांना न्यू इंडिया अशुरन्स कंपनीकडुन 1 लाख रूपयांचा अपघाती विमा देण्यात आला.
कोरोनामुळे रक्तदान शिबिरांना ब्रेक लागला. यामुळे रक्ताची गरज मोठय़ा प्रमाणात भासू लागली आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने या शिबिराचे आयोजन केले होते. क्लबचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सेपेटरी विनयकुमार बालीकाई, इव्हेंट चेअरमन हेमेंद्र पोरवाल व डी. बी. पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अशोक बदामी, इनरव्हील क्लबचे अध्यक्ष डॉ. सुषमा शेट्टी, वेणुग्राम हॉस्पिटलचे डॉ. रमेश देशपांडे, एलआयसीचे अजित वारकरी, न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनीचे शशिकांत हलगेकर यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना कलबचे अध्यक्ष अरविंद खडबडी यांनी रक्तदानाविषयी माहिती देत नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.
महावीर ब्लडबँक, केएलई ब्लडबँक व सिव्हील हॉस्पिटल ब्लडबँकच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी जनैन युवक मंडळ ट्रस्ट, हेबसुर मेडिकल्स, एचडीएफसी बँक, इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब, बेलगाम सीटी ऍण्ड तालुका फोटो ऍण्ड व्हीडिओग्राफर असोसिएशन, वेणुग्राम हॉस्पिटल व एलआयसी यांचे पदाधिकारी व राहुल आंबेवाडी, महेश अनगोळकर, लतेश पोरवाल, चंद्रकांत राजमाने, राजेश तळेगाव, विक्रम जैन, संजीव देशपांडे उपस्थित होते.