रोख 48 हजार व आयफोन काढून घेतला
कोल्हापूर प्रतिनिधी
चारचाकी गाडीच्या व्यवहारातून मारहाण करुन रोख 48 हजार रुपये, आयफोन मोबाईल व कराराचे पेपर जबरदस्तीने काढून घेतल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अक्षय रविंद पोळ, ऋतुराज पोळ (निपाणी,बेळगाव, कर्नाटक) आणि एक अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमित बाळासाहेब बुकशेट (वय रा.38 मेन रोड, कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी,अमित बुकशेट आणि संशयितांमध्ये चारचाकी गाडीचा व्यवहार होता. मंगळवारी या व्यवहाराचे करारपत्र करण्यासाठी बुकशेट न्यायालयात गेले होते. त्यावेळी अक्षय पोळ,त्याचा चुलत भाऊ ऋतुराज पोळ आणि एक अनोळखी हे सुध्दा बरोबर होते. बुकशेट यांना अक्षय पोळकडून 3 लाख 50 हजार पोहाचले. तसेच बुकशेट यांनी सुरक्षितता म्हणून पोळकडे दिलेली मित्राची टाटा हॅरियर ही गाडी बुकशेट यांच्याकडून विकत घेतली आहे अशी 100 रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी केली.
नोटरी केल्यानंतर ते सर्व न्यायालयाच्या आवारातून बाहेर येऊन एका हॉटलसमोर थांबले. त्यावेळी बुकशेट यांनी ठरलेल्या व्यवहारातील उर्वरित 1 लाख 3 हजार रुपयांची मागणी केली. पण पोळने आता पैसे व गाडीही देणार नाही असे म्हणून बुकशेट यांना मारहाण केली. ऋतुराज पोळने त्यांच्या हाताचा चावा घेतला. दरम्यान,अक्षय पोळने कराराचे पेपर, बुकशेट यांच्या पॅन्टच्या खिशातील 48 हजार रुपये व आयफोनचा मोबाईल काढून घेऊन पसार झाले. याप्रकरणी बुकशेट यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील या गुन्हय़ाचा तपास करत आहेत.