गाळे मंजूर झालेल्यांना मनपाकडून नोटीस
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या मालकीचे गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. 135 गाळय़ांपैकी 102 गाळय़ांना बोली लागली होती. त्यामुळे सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला असून, अनामत रक्कम आणि चार महिन्यांची भाडय़ाची रक्कम जमा करून गाळय़ांचा ताबा घेण्यासाठी महसूल विभागाने नोटीस पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेने विविध ठिकाणी असलेल्या मटण मार्केट, हॉल, कसाईखाना आदींसह 238 आस्थापने भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मटण मार्केट व फिश मार्केट आणि महांतेशनगरमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. दुसऱया टप्प्यात 154 गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. त्यापैकी खंजर गल्ली येथील 39 गाळे भाडेतत्त्वावर देण्यास न्यायालयाची स्थगिती असल्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नाही. मात्र, अन्य गाळय़ांचा लिलाव करण्यात आला होता. 102 गाळय़ांना बऱयापैकी बोली लागली होती.
केपीटीसीएल कार्यालयाशेजारील गाळे, महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे आणि सरदार्स हायस्कूल मैदान अशा विविध ठिकाणांच्या गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. याला चांगली बोली लागल्याने महापालिकेला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळणार आहे.
मागासवर्गीय व अपंगांसाठी राखीव असलेल्या गाळय़ांची लिलाव प्रक्रिया अद्याप राबविण्यात आली नाही. मात्र, सामान्यांसाठी खुले असलेल्या लिलाव प्रक्रियेत 102 गाळय़ांसाठी भाडेकरू निश्चित झाले आहेत. सदर गाळे हस्तांतर करण्यापूर्वी अनामत रक्कम आणि चार महिन्यांचे आगाऊ भाडे महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनामत रक्कम व भाडे भरण्यासाठी लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्यांना नोटीस पाठविण्याची मोहीम महसूल विभागाने हाती घेतली आहे.
दिलेल्या मुदतीत अनामत रक्कम व भाडय़ाची रक्कम जमा केल्यानंतरच गाळे हस्तांतर करण्यात येणार आहेत. अनामत रक्कम व भाडय़ाची रक्कम जमा न केल्यास गाळे भाडेतत्त्वावर देण्याचे रद्द करण्यात येईल, अशी सूचना नोटिसीद्वारे करण्यात आली आहे.