चिनी कंपन्यांना युरेनियमच्या खाणीसाठी पाककडून जमिनींचे वाटप
वृत्तसंस्था/ मुजफ्फराबाद
आंतरराष्ट्रीय नियम आणि स्वतःच्या राज्यघटनेलाही पायदळी तुडवत पाकिस्तानने चीनला गिलगिट-बाल्टिस्तान मधील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करण्याची मोकळीक दिली आहे. पाकिस्तानच्या सरकारने तेथे सोने, युरेनियम आणि मोलिब्डेनमच्या खाणींसाठी चिनी कंपन्यांना 2 हजारपेक्षा अधिक भूखंड उपलब्ध केले आहेत.
युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे (यूकेपीएनपी) प्रवक्ते नासिर अजीज खान यांची माहिती दिली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची पाकिस्तानने चालविलेली लूट जगासमोर आणणार आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे अजीज यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानच्या घटनेतील कलम 257 नुसार सरकारला गिलगिट-बाल्टिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करण्याची मोकळीक नाही. स्थानिक लोकांना या प्रक्रियेपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. स्थानिकांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्याने विरोध केल्यास त्याचा छळ केला जात असल्याचे अजीज म्हणाले.
चीन आणि पाकिस्तान यांनी दियामार येथे सिंधू नदीवर दियामर बाशा धरणाची निर्मिती चालविली आहे. पाकिस्तान सरकारने 444 अब्ज रुपयांचे (पाकिस्तानी चलन) कंत्राट पॉवर अँड प्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशन (एफडब्ल्यूओ) या चिनी कंपनीला दिले आहे. एफडब्ल्यूओ या कंपनीत चायना पॉवरची हिस्सेदारी 70 टक्के इतकी आहे.