ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातच्या किनाऱ्यावर आज सकाळी ‘अल हुसेनी’ नावाची पाकिस्तानी मासेमारीची बोट पकडण्यात आली. या बोटीतून 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 400 कोटी रुपये आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. डिफेन्स पीआरओने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.
आज सकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर संशयास्पद पाकिस्तानी मासेमारीची बोट तटरक्षक दलाने दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने पकडली. ‘अल हुसेनी’ नावाच्या या बोटमध्ये सहा क्रू सदस्य होते. बोटीची झडती घेतली असता 77 किलो हेरॉईन आढळले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 400 कोटी रुपये आहे. दहशतवाद विरोधी पथकाने हे हेरॉईन हस्तगत करत बोटीतील सहा जणांना अटक केली आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.