सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या तपशिलातून वास्तव उघड
प्रतिनिधी/दिल्ली
देशात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव गेला. दरम्यान, गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अधिकृत आकडेवारीच्या दुप्पट असल्याची कबुली राज्य सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. कोरोनाबळींच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याबाबतचा तपशील सादर करताना गुजरात सरकारने ही नवी आकडेवारी दिली. त्यामुळे देशभरातच कोरोनाबळींच्या अधिकृत आकड्यापेक्षा प्रत्यक्षात मृतांची संख्या अधिक असल्याच्या सर्वेक्षणातील दाव्याला बळकटी मिळाली आहे.
सोमवारी कोरोनाबळींच्या वारसांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबतचा तपशील गुजरात आणि महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केला. गुजरातमधील कोरोनाबळींची अधिकृत संख्या १०,०९८ आहे. मात्र, प्रत्यक्षात गुजरात सरकारने १९,९६४ मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई दिल्याचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. राज्यात ३४,६७८ जणांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले. त्यापैकी १९,९६४ जणांना नुकसानभरपाई देण्यात आली. गुजरातच्या या नव्या आकडेवारीमुळे देशातील कोरोनाबळींची संख्या दोन टक्क्यांनी वाढली आहे.