वृत्तसंस्था/ अहमदाबाद
या शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य केलेल्या 11 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची पाठवणी स्थलांतरित छावणीमध्ये करण्यात आली असून त्यांना बांगलादेशात परत पाठविले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अहमदाबादमध्ये किमान 50 हजार बांगलादेशी नागरिक राहात असल्याचा अंदाज आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिक विविध खासगी प्रकल्पांवर काम करीत होते. शनिवारी सकाळी त्यांच्या वसतीच्या ठिकाणांवर धाड टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारी विश्वासार्ह कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. गुजरात पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यासाठी दोन दले स्थापन केली आहेत.