वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसमधील आमदारांच्या राजीनामा सत्र शुक्रवारीही सुरूच राहिले. मोरबी विधानसभेचे आमदार बृजेश मेरजा यांनी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी गुरुवारी वडोदरा जिल्हय़ातील कर्जनचे आमदार अक्षय पटेल आणि वलसाड जिल्हय़ातील कपराडा मतदारसंघाचे आमदार जीतू चौधरी यांनी राजीनामा दिला
होता.
मार्च महिन्यात राज्यातील काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरातमधील चार जागांचा समावेश आहे. आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच राहिल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे.
गुजरात 182 विधानसभा सदस्यांपैकी भाजपचे 103 तर काँग्रेसचे 66 सदस्य आहेत. 9 जागा रिक्त आहेत. भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचे काँग्रेसला समर्थन आहे. राज्यसभेच्या एक जागा जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे. यामुळे दोन जागांवर काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता.
यानंतर आता तिघांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने केवळ 61 आमदारच पक्षाकडे राहिले आहेत. अशातच भारतीय ट्रायबल पार्टी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे मतपरिवर्तन होत असल्याची चर्चा असल्याने काँग्रेस नेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.