प्रतिनिधी / बेळगाव
श्री गुजरात नवरात्रोत्सव मंडळ यांच्यावतीने नेहमीच अन्नदान करण्यात येत असते. गेल्या 60 वर्षांपासून त्यांनी कठीण काळात सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या कोविडमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील कोरोना योद्धय़ांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण पाठवून देण्यात येत आहे.
कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत. मात्र त्यांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे श्री गुजराती नवरात्रोत्सव मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे. संत मीरा हायस्कूल येथे असलेल्या कोविड केअर सेंटरला गेल्या 15 दिवसांपासून अन्नदान करण्यात येत आहे. रुग्णवाहिका घेण्यासाठीदेखील यापूर्वी बजरंग दलला आर्थिक मदत करण्यात आली आहे.
नुकतीच बेळगाव पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुजरात भवन येथे भेट दिली. त्यांनी संत जलाराम बाप्पा आणि आंबेमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर या उपक्रमाची पाहणी करून कौतुक केले. यावेळी संस्थापक सदस्य भुपेंद्र पटेल, विजय भद्रा, भाविन पटेल, भावेश चुडासमा, श्रेयश दोशी, दक्षेत राणा, विपुल पटेल, गौरंग राणा, तेजस दोशी, बिजल राणा, नितीन भद्रा, हितेश पटेल, हर्षल पटेल, महादेव ठोकणेकर व राहुल पाटील उपस्थित होते.