वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिल्यांदा सहभागी होत असल्याने त्यांच्यात विजयी सलामीसाठी चुरस राहील.
गुजरात टायटन्सचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांडय़ाकडे असून लखनौ सुपर जायंटस्चे कर्णधारपद के.एल. राहुल भूषवित आहे. गुजरात संघामध्ये आक्रमक फलंदाज शुभम गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, डेव्हिड मिलर यांचा समावेश आहे. या संघामध्ये गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने मोहम्मद शमी, रशीद खान, जयंत यादव यांच्यावर राहील.
लखनौ संघामध्ये कर्णधार के.एल. राहुल, मनिष पांडे, दक्षिण आफ्रिकेचा डिकॉक, अष्टपैलू दीपक हुडा, कृणाल पांडय़ा आणि विंडीजचा होल्डर यांचा समावेश आहे. आवेश खान, स्टोनिस, मेयर्स, करण शर्मा हे प्रमुख गोलंदाज आहेत.