सिनेमा जितका आजच्या जगातील अनुभवांशी जुळणारा असतो तितके त्या सिनेमाशी प्रेक्षक जास्त एकरूप होतात. गेल्या काही दिवसात आजच्या जगात नेमकं काय सुरू आहे हे दाखवणाऱया सिनेमांची निर्मिती होत आहे. नात्यावर बेतलेल्या सिनेमात प्रेक्षक गुंततो तो याच कारणामुळे. आजच्या जोडप्यांना मूल जन्माला घालणे ही मोठी जबाबदारी वाटते. मुळात लग्नानंतर एकमेकांना स्पेस देण्याच्या मुददय़ावरून दोघांचे सूर जुळत नाहीत. त्यातच गुडन्यूज येऊन धडकते आणि त्यांचे आयुष्य बदलून जाते. याच वन लाइन स्टोरीवर वेल डन बेबी या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱया ‘वेल डन बेबी’ या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी केले आहे. पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कौटुंबीक सिनेमा आहे. यात विविध भावनांच्या मिश्रणासोबतच या सिनेमाची कथा प्रत्येकाला आपलीशी वाटेल.
ऍमेझॉन सादर करत असलेली वेल डन बेबी ही एका कुटुंबावरून प्रेरित अशी हृदयस्पर्शी कथा आहे. यामध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याची भूमिका अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग साकारत आहेत. या सिनेमात ते आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत. पण, नशीबच त्यांना तो उद्देश देऊ करते. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी हि कथा अत्यंत गुंतवून ठेवणारी आहे आणि ही कथा नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकून घेईल असा विश्वास या सिनेमाच्या टीमला वाटत आहे.
ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवर सादर होणाऱया या आगामी सिनेमाबद्दल ऍमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियाच्या कंटेट विभागाचे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले, ‘गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आमच्या ग्राहकांना दुसरा मराठी डायरेक्ट-टू-स्ट्रीमिंग सिनेमा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.
या सिनेमाबद्दल अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला, ‘वेल डन बेबी हा माझा प्रिय सिनेमा आहे. ही कथा मांडणे आणि व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे हिंदोळे जिवंत करणे हा एक स्वतंत्र प्रवासच होता. या सिनेमाबद्दल बहुआयामी अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली, ‘वेल डन बेबीची सुंदर कथा हृदयाला नक्की हात घालेल.
ही मनोरंजक कथा तुम्हाला हसवेलही आणि प्रसंगी भावनिकही करेल. अनेक अर्थांनी आपली वाटावी, अशी ही कथा आहे.
या मनोरंजक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाबद्दल दिग्दर्शक प्रियंका तंवर म्हणाली, ही एक अपांरपरिक आधुनिक काळातील कथा आहे. कुटुंबातील प्रत्येक जण या सिनेमाचा आनंद घेऊ शकतो.