ऑनलाईन टीम / भोपाळ :
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मध्यप्रदेश सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी त्यांचा पैसा आणि संपत्ती गरिबांमध्ये वाटण्यात येणार असून, मध्यप्रदेश सरकारचा गृह आणि कायदे विभाग एकत्रितपणे या विधेयकावर काम करत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मिश्रा म्हणाले, मध्यप्रदेशातील वाढती गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे या गुन्हेगारीला रोखण्यासाठी सरकार कडक कायदा करणार आहे. हा कायदा उत्तर प्रदेशच्या गँगस्टर ऍक्टपेक्षाही जास्त कठोर असेल. त्यामध्ये गुन्हेगारांची संपत्ती जप्त करुन गरीबांमध्ये वाटली जाईल. मध्यप्रदेश सरकारचा गृह आणि कायदे विभाग एकत्रितपणे या विधेयकावर काम करत आहे. गुन्हेगारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱयांनादेखील शिक्षेची तरतूद या विधेयकामध्ये केली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात मध्यप्रदेश सरकार हे विधेयक मांडण्याची शक्यता आहे, असेही मिश्रा म्हणाले.