प्रतिनिधी/ मडगाव
मारामारी करुन एका युवकाला जबर जखमी केल्याप्रकरणासंबंधी कुडचडे पोलिसांनी जप्त केलेले एक वाहन अटी घालून मालकाला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणी कुडचडे पोलीस स्थानकात 100/2020 या क्रमांकाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एका हाणामारीप्रकरणासंबंधी पोलिसांनी जीए-09-क्यू-3487 क्रमांकाचे वाहन जप्त केले होते. संशयित नरेश नाईक, प्रसाद नाईक व साहील यांनी संगनमत करुन सूरज बासुमंतारी याला मारहाण करुन जखमी केले होते असे कुडचडे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटलेले आहे.
याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 323, 447, 504, 427, 188, 269 कलमाखाली गुन्हा नोंद करुन वरील क्रमांकाचे वाहन जप्त केले होते. या वाहनाची मालकीण श्रीमती प्रेमा मारुती हरिजन हिने न्यायालयात धाव घेऊन जप्त केलेले हे वाहन मुक्त करण्याची विनंती केली होती. यावर न्यायालयात दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्या. निलीमा काणकोणकर यांच्या न्यायालयाने विविध अटी घालून वाहन मुक्त करण्याचा आदेश दिला.